मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘झेब्रु – रस्ता सुरक्षा जनजागृती शुभंकर’चे अनावरण.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे ‘झेब्रु – रस्ता सुरक्षा जनजागृती शुभंकर’चे अनावरण करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वाढत्या नागरीकरणामुळे वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. अपघात रोखण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेतून’ नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जागरूक करण्यात येत आहे. अपघात होणारच नाहीत, यासाठी नागरिकांना ‘वाहतूक साक्षर’ करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. या मोहिमेची ही फलश्रुती असून विविध विभागांच्या माध्यमातून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून रस्ता सुरक्षा मोहिमेत सहभाग घ्यावा. ‘रस्ता सुरक्षा जीवन रक्षा’ हा मूलमंत्र अंगीकारावा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ‘झेब्रु’ शुभंकरचे अनावरण हे परिवहन विभागाचे महत्त्वाचे पाऊल आहे. या शुभंकरमुळे अपघात रोखण्यासाठी ‘रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम’ अधिक प्रभावी ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
