मा. मंत्री श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सातारा–कागल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला
सातारा–कागल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले असून, सदर कालमर्यादेचे काटेकोर पालन होईल, यासाठी राज्य शासन पूर्णतः कटिबद्ध आहे. तथापि, या प्रकल्पातील एका ठेकेदार संस्थेकडून शासनाने निर्धारित केलेल्या गतीने काम होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
या अनुषंगाने, संबंधित ठेकेदारास पंधरा दिवसांची अंतिम नोटीस देण्यात आली असून, या कालावधीत लक्षणीय व समाधानकारक प्रगती न झाल्यास, शासनाच्या प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार सदर ठेका तात्काळ रद्द (टर्मिनेट) करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) मा. श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली.
महामार्ग प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती देण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वीच केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाशी समन्वय साधला आहे. त्यानुषंगाने, नवी दिल्ली येथे सातारा–कागल राष्ट्रीय महामार्गासंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. ही बैठक केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत प्रकल्पाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत स्पष्ट व ठोस निर्देश देण्यात आले असून, गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेत पूर्णता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला, असे मा. मंत्री श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितले.